शेतीसाठी पाणी व्यवस्थापनावर तज्ञांनी केले मार्गदर्शन
जळगाव, दि. ६ : केंद्र सरकारच्या जलसंधारण मंत्रालय व तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नशिराबाद येथे ‘समृद्धी की पाठशाला’ या उपक्रमांतर्गत वाघूर डावा कालवा असोदा-भादली शिवार परिसरातील शेतकऱ्यांसाठी,एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या एमसीएडी समृद्धी योजनेअंतर्गत आयोजित या कार्यशाळेत शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमास केंद्रीय जलसंधारण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी अशोक जेएफ, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन, कार्यकारी अभियंता उत्तम दाभाडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ बी. डी. जडे तसेच तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळेत उपलब्ध जलस्रोतांचा कार्यक्षम व नियोजनबद्ध वापर करून अधिक उत्पादन कसे घेता येईल, पाणी बचत व पाणी व्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पाण्याचा प्रत्येक थेंब शेतीच्या विकासासाठी महत्त्वाचा असून आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत करता येते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
केंद्रीय जलसंधारण विभागाचे प्रकल्प संचालक अशोक जेएफ यांनी पाणी व्यवस्थापन, शेतीसाठी पाणी नियोजन आणि प्रेशरयुक्त पाईप सिंचन प्रणालीचे फायदे यावर मार्गदर्शन केले. पारंपरिक सिंचन पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, प्रेशरयुक्त पाईप इरिगेशन प्रणालीमुळे पाण्याची वाहतूक अधिक कार्यक्षम होते. बाष्पीभवन व गळतीमुळे होणारे नुकसान कमी होते आणि पिकांना आवश्यक तेवढेच पाणी वेळेवर उपलब्ध होते. तसेच शेतात समान दाबाने सिंचनाचे पाणी पुरविले जात असल्याने पिकांच्या वाढीस मदत होते.
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जलसंवर्धन व पाणी बचतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. समृद्धी योजनेमुळे पाण्याचे व्यवस्थापन अधिक परिणामकारक होईल तसेच कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी सूक्ष्म सिंचनासह प्रेशरयुक्त पाईप सिंचन प्रणाली प्रभावी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. “शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. त्याच उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी समाजमाध्यम तज्ज्ञ अंकित पांडे, शास्त्रज्ञ बी. डी. जडे आणि पंडित शिंदे यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात सहाय्यक अभियंता किशोर देशमुख यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्दिष्टे स्पष्ट केली.
कार्यक्रमात पाणी वापर व पाणी बचतीचे महत्त्व तसेच प्रेशर पाईप इरिगेशन सिस्टीमविषयी माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. उपस्थित शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती घेतली.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अपूर्वा वाणी यांनी केले. कार्यक्रमास वाघूर प्रकल्प, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कर्मचारी तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
